वाचन प्रेरणा दिन आणि महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त मो. ह. विद्यालय व रमेश परमार कनिष्ठ महाविद्यालय तसेच शिक्षक महासंघ, मुंबई व कोकण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मो. ह. विद्यालयात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महात्मा जोतिराव फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १०० शिक्षक उपस्थित होते
शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांच्या पुढाकाराने आयोजित या व्याख्यानात प्रसिद्ध पत्रकार व व्याख्याते किरण सोनवणे यांनी महात्मा जोतिराव फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि परिवर्तनवादी विचारांचे महत्त्व विशद केले. महात्मा फुले यांच्या कार्याचा आणि विचारांचा समाजावर झालेला प्रभाव अधोरेखित करत त्यांनी अत्यंत मार्मिक शब्दांत भाष्य केले.
वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी कोणती पुस्तके वाचावीत, विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती कशी रुजवावी आणि महात्मा फुले यांचा वैचारिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी शिक्षकांनी कोणते प्रयत्न करावेत, याविषयी श्री. सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. महात्मा फुले यांचे विचार केवळ पुस्तकी स्वरूपात न ठेवता ते विद्यार्थ्यांच्या आचरणात आणि सामाजिक जाणीवांमध्ये रुजविण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. यावेळी शिक्षक महासंघ, मुंबई व कोकण विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक परीक्षण स्पर्धेची घोषणा करण्यात आली. शिक्षकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, पुस्तकांचे चिकित्सक आकलन वाढावे आणि वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन मिळावे, हा या स्पर्धेमागील उद्देश आहे. व्याख्यानात सहभागी झालेल्या सर्व शिक्षकांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सविता पेंडसे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जिता कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रमाला जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या संचालक मंडळाचे सदस्य राजेंद्र राजपूत, सौ. स्नेहा शेडगे आणि सुनील पाटील उपस्थित होते. वाचनसंस्कृतीचा प्रसार, महात्मा फुले यांच्या विचारांचा जागर आणि शिक्षकांच्या वैचारिक समृद्धीसाठी आयोजित हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.
वाचन प्रेरणा दिन व महात्मा फुले द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त मो. ह. विद्यालयात व्याख्यानाचे आयोजन



