ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात अग्निसुरक्षा सप्ताहाचा उत्साह
आग लागल्यावर धावपळ नव्हे, तर आधीच सज्जता हवी, हा महत्त्वाचा संदेश देत प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे येथे फायर सेफ्टी वीक २०२६’ अंतर्गत विविध जनजागृती आणि प्रशिक्षण उपक्रम उत्साहात पार पडले. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या निर्देशानुसार ४ मे ते १० मे दरम्यान आयोजित या उपक्रमात रुग्ण, नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांना अग्निसुरक्षेचे महत्त्व प्रभावीपणे पटवून देण्यात आले.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमात Safe Hospitals, Safe Homes, Safe Communities’ ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवण्यात आली. ओपीडी विभागात पोस्ट बेसिक डिप्लोमा इन सायकियाट्रिक नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक आणि माहितीपूर्ण पोस्टर प्रदर्शन भरवून RACE’ व PASS’ प्रोटोकॉल, आग प्रतिबंधक उपाययोजना आणि आपत्कालीन व्यवस्थापनाविषयी जनजागृती केली.
यानंतर हायटेक फायर सेफ्टी सोसायटी तर्फे प्रत्यक्ष अग्निशमन प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. फायर एक्सटिंगविशरचा योग्य वापर, स्मोक डिटेक्टर प्रणाली, आपत्कालीन स्थलांतर प्रक्रिया तसेच रुग्णांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात आले. विशेष म्हणजे, मानसिक आरोग्य रुग्णालयातील रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक कर्मचाऱ्याने सतर्क आणि प्रशिक्षित असणे किती आवश्यक आहे, यावर विशेष भर देण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अग्निसुरक्षेची शपथ घेत रुग्णालय अधिक सुरक्षित आणि सज्ज ठेवण्याचा संकल्प केला. या उपक्रमामुळे रुग्णालय परिसरात सुरक्षिततेबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, समाजातही अग्निसुरक्षेविषयी जनजागृतीचा महत्त्वपूर्ण संदेश पोहोचला.


