प्रेमास प्रतिसाद न देणाऱ्या महिलेची हत्यामृतदेह जाळणाऱ्या प्रियकराच्या गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

प्रेम प्रकरणात प्रतिसाद देत नसल्याने व मोबाईल फोन उचलत नसल्याच्या रागातून महिलेस घरी बोलवून तिची हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह निर्जनस्थळी जाळून टाकणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात भिवंडी गुन्हे शाखेस यश मिळाले आहे. संजय मुकादम उर्फ द्वारकाप्रसाद वर्मा असे अटक आरोपीचे नाव असून सरितादेवी विकास महतो वय ३३ वर्षे असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील पद्मानगर परिसरात राहणाऱ्या सरितादेवी विकास महतो यांची संजय मुकादम उर्फ द्वारकाप्रसाद वर्मा यासोबत ओळख होती. महिला प्रेमसंबंध ठेवत नाही तसेच फोनवर बोलत नाही याचा राग आल्याने ११ मे रोजी याने महिलेस आपल्या घरी बोलवून घेतले. मयत महिलेने मोबाईल देण्यास नकार दिल्याने त्यांच्यात भांडण झाले. या वादात आरोपीने महिलेची दुपारी हत्या करून मृतदेह घरातच ठेवून रात्र होण्याची वाट पाहिली. मध्यरात्री नंतर अडीच वाजताच्या सुमारास महिलेचा मृतदेह प्लॅस्टीक पोत्यामध्ये भरून खांद्यावरून पद्मानगर परिसरातील दुर्गा प्रसाद हॉटेलजवळील मैदानात येथे मोकळ्या जागेत घेवून जात तेथे भंगार कपड्याचा धाग्यांचा वापर करून मृतदेह जाळून टाकुन पुरावा नष्ट केला होता.

या प्रकरणी भिवंडी शहर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा समांतर तपास भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शीतल राऊत यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथक करीत होते. गुन्ह्याचा कोणताही पुरावा नसताना व मृतदेहाची ओळख पटवून गुन्हे शाखेने घटनास्थळाच्या आजुबाजुस असलेल्या यंत्रमाग कारखाना व दाट कामगार वस्तीमध्ये चौकशी करून, गुप्त बातमीदार तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करून आरोपी द्वारकाप्रसाद गिरीधारीप्रसाद वर्मा उर्फ संजय मुकादम, वय ४२ वर्षे या यंत्रमाग कारखान्यात राहणाऱ्या संशयितास ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीराज माळी, मिथुन भोईर, पोलिस उपनिरीक्षक रविंद्र बी.

पाटील, राजेश शिंदे, रामचंद्र जाधव, पोलिस कर्मचारी सुधाकर चौधरी, निलेश बोरसे, साबिर शेख, सुदेश प्राम, प्रशांत राणे, प्रकाश पाटील, वसंत चौरे, रंगनाथ पार्टी, वामन भोईर, किशोर थोरात, शिवाजी मुर्तडक, विजय कुंभार, नितीन नंदीवाले, सर्फराज तडवी, रविंद्र साळुंखे, माया डोंगरे, अनु सायली गंमेरा यांनी ही कामगिरी केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top