नवी मुंबईतील एसआयआर कामाचा जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी घेतला आढावा

नवी मुंबई शहर क्षेत्रात मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत ‘एसआयआर’ (SIR) चे काम वेगाने सुरू आहे. या कामाच्या प्रगतीचा आणि एकूण वाटचालीचा सविस्तर आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या उच्चस्तरीय बैठकीत निवडणूक प्रक्रियेशी संबंधित सर्व अधिकारी, सहाय्यक निवडणूक अधिकारी आणि विविध पथकांचे प्रमुख उपस्थित होते.

बैठकीदरम्यान प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबई पालिका क्षेत्रात ‘एसआयआर’ अंतर्गत ८ ऑगस्टपासून हे विशेष अभियान राबवले जात आहे. या मोहिमेत बेलापूर विधानसभा मतदारसंघात १ हजार ५०५ आणि ऐरोली विधानसभा मतदारसंघात १५६ अशी एकूण १ हजार ६६१ विशेष पथके प्रत्यक्ष मैदानावर कार्यरत आहेत. ही पथके घरोघरी जाऊन मतदार नोंदणी, नाव दुरुस्ती आणि प्रमाणीकरणाचे काम अत्यंत बारकाईने करत आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी बैठकीत स्पष्ट निर्देश दिले की, मतदार याद्यांचे काम अत्यंत पारदर्शक, अचूक आणि विहित वेळेत पूर्ण झाले पाहिजे. कोणत्याही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीतून सुटणार नाही आणि मतदार यादीतील चुका त्वरित दुरुस्त केल्या जातील, याची दक्षता सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी. तसेच या प्रक्रियेत नागरिकांना कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी पालिका प्रशासनाकडून या कामाला सर्वतोपरी सहकार्य दिले जात असल्याचे सांगत, सर्व सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी आपापल्या क्षेत्रातील कामावर प्रत्यक्ष लक्ष ठेवावे, असे निर्देश दिले. निवडणूक कामात कोणत्याही प्रकारची हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा देत त्यांनी हे काम वेळेत आणि पूर्ण अचूकतेने पूर्ण करण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले.

या महत्त्वाच्या आढावा बैठकीस अतिरिक्त आयुक्त, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, बेलापूर व ऐरोली विधानसभा मतदारसंघांचे मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Scroll to Top