भारताच्या संरक्षणासाठी मुंबईत १७ मे रोजी ‘श्री राजमातंगी महायज्ञ’

जगावर सध्या तिसऱ्या महायुद्धाचे काळे ढग दाटले असताना, केवळ राजकीय किंवा बौद्धिक स्तरावरील प्रयत्न पुरेसे नसून राष्ट्राला आध्यात्मिक अधिष्ठानाची मोठी गरज आहे. याच उदात्त हेतूने, भारताला अभेद्य आध्यात्मिक संरक्षककवच लाभावे आणि देशाची सर्वांगीण प्रगती होऊन पुन्हा एकदा ‘रामराज्या’चा उदय व्हावा, या संकल्पपूर्तीसाठी – सनातन संस्थेच्या वतीने मुंबईत ‘श्री राजमातंगी महायज्ञा’चे आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवारी, १७ मे २०२६ रोजी प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिराच्या पाठीमागे असलेल्या नर्दुल्ला टँक मैदानावर दुपारी ३.३० ते सायं. ७.३० या वेळेत हा यज्ञ सोहळा अत्यंत मंगलमय वातावरणात संपन्न होणार आहे, अशी माहिती सनातन संस्थेचे प्रवक्ता अभय वर्तक यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता चेतन राजहंस, पुरोहित अन् ज्योतिर्विद श्रेयस पिसोळकर आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे नवी मुंबई समन्वयक कैलास पाटील उपस्थित होते. हा महायज्ञ केवळ धार्मिक विधी नसून तो राष्ट्ररक्षणाचा एक आध्यात्मिक लढा असल्याचे या वेळी अधोरेखित करण्यात आले.

या यज्ञाचे आध्यात्मिक महत्त्व विशद करताना अभय वर्तक म्हणाले की, आदिशक्ती देवी सतीच्या क्रोधातून प्रकट झालेल्या ‘दशमहाविद्यां ‘मध्ये मातंगीदेवीचे स्थान अनन्यसाधारण आहे. देवी मातंगी ही आदिशक्तीची ‘प्रधानमंत्री’ म्हणजेच प्रमुख सल्लागार मानली जाते. शत्रूवर विजय मिळवण्यासाठी आणि प्रतिकूल परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी या देवीची उपासना फलदायी ठरते. ऐतिहासिक संदर्भाचा दाखला देत त्यांनी सांगितले की, त्रेतायुगात प्रभू श्रीरामाच्या अवताराच्या वेळीही राजमातंगी देवीचे तत्त्व कार्यरत होते, ज्यामुळे आदर्श रामराज्य स्थापन होऊ शकले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top