पडघा बोरिवलीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

भिवंडी – भिवंडी तालुक्यातील पडघा जवळील बोरिवली गाव शिक्षण, सामाजिक सलोखा आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या नव्या आदर्शामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. बोरिवली पडघा येथील प्रसिद्ध सोहराब गुजर हॉल येथे एसएससी (दहावी) आणि एचएससी (बारावी) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मानार्थ भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामपंचायत बोरिवली, माजी सरपंच सोहराब गुजर आणि अॅड. झियाद सोहराब गुजर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात मुस्लिम व बिगर-मुस्लिम विद्यार्थ्यांचा एकत्रित सन्मान करून सामाजिक ऐक्याचा सुंदर संदेश देण्यात आला. या भव्य सोहळ्याचे आकर्षक आणि प्रभावी सूत्रसंचालन टेनिस क्रिकेट स्पर्धांमधील लोकप्रिय समालोचक सिद्दीक भाभे यांनी केले. आपल्या खास शैलीत, शायरी आणि विनोदी अंदाजातून त्यांनी संपूर्ण कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. कार्यक्रमाला राजकीय, प्रशासकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक आमदार शांताराम मोरे, भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश भोईर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भिवंडी ग्रामीणचे अध्यक्ष गणेश गुलवी तसेच अभियंता दुर्राज कामानकर उपस्थित होते. याशिवाय पडघा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक देशमुख आणि पोलीस अधिकारी रुपेश जाधव यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या यशाचे अभिनंदन केले.

बोरिवली ग्रामपंचायतीचे सरपंच अनवर अब्दुल पिंजारी आणि ग्रामपंचायत अधिकारी गणेश जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींना ट्रॉफी, सन्मानचिन्हे आणि इतर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे सर्व धर्मीय समाजघटकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. माजी सरपंच नदीम मुल्ला, शमून खोत तसेच ग्रामपंचायत सदस्य अकबर अब्दुल्ला खोत यांनीही उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. खुर्रम नाचण, साजिद खोत, अल्ताफ नाचण, सादात मुल्ला, वासिम जवरे, कैस बर्डी आणि अरफात हरे यांसारख्या स्थानिक तरुणांनी शिक्षण आणि भाईचाऱ्याची परंपरा कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

कार्यक्रमात तालुका व जिल्हा पातळीवर उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उत्कृष्ट निकालासाठी कोकण मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचालित पडघा बोरिवली हायस्कूलचाही गौरव करण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top