शहापूर – पुण्यात विषारी दारू मुळे पंचवीस जणांचा जीव गेल्याची घटना घडल्यामुळे पोलिस प्रशासन चांगलेच जागे आहे. ठाणे ग्रामीण पोलिसांनी अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करत शहापूर व भिवंडी तालुक्यातील विविध ठिकाणी छापे टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत अनेक आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने ही मोहीम राबवली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश कदम यांच्या पथकाने शहापूर तालुक्यातील सरळांबे, भातसा नदी किनारा आणि खुटघर परिसरात छापे टाकले. या कारवाईत सुमारे ३ लाख ३३ हजार ५०० रुपयांचा गावठी दारू निर्मितीसाठी वापरला जाणारा कच्चा माल व साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी चार जणांच्या विरोधात विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तसेच भिवंडी तालुक्यातील कालवार गावाजवळील झाडाझुडपांमध्ये सुरू असलेल्या अवैध गावठी दारू अड्ड्यावरही पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत १ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोन जणं यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणे ग्रामीण पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध गावठी दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, अशा बेकायदेशीर धंद्यांविरोधात पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. असे असले तरी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अजून कोणतीही मोठी कारवाई करण्यात आली नसल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कारभार वर शंका उत्पन्न होत आहे.


