भिवंडी – पडघा परिसरातील टी.ए. पाटील इंग्रजी शाळेने यंदाच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एसएससी) परीक्षेत पुन्हा एकदा शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
शाळेने सलग १५ वर्षांपासून १०० टक्के निकालाची नोंद करत शैक्षणिक गुणवत्तेचा उच्च दर्जा कायम ठेवला असून यंदाही विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश मिळवून शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे. यावर्षीच्या दहावीच्या परीक्षेत स्नेहा श्याम नवलखेरे हिने २२.६० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. धनश्री शशिकांत भोईर हिने २२.२० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला. तर गीता चोपाराम चौधरी आणि श्रेयश आनंदराव नोरे यांनी प्रत्येकी २०.६० टक्के गुण मिळवत संयुक्तरीत्या तृतीय क्रमांक पटकावला.
दहावीच्या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा शाळा व्यवस्थापनाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या यशामुळे शाळेतील शिक्षक, पालक, व्यवस्थापन आणि परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या प्रसंगी शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांच्या यशामागील विविध घटकांवर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांची मेहनत, जिद्द, चिकाटी आणि अभ्यासावरील निष्ठा यासोबतच शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि शाळेचे शैक्षणिक वातावरण यांचा या यशामध्ये महत्त्वाचा वाटा असल्याचे नमूद करण्यात आले. मुख्याध्यापक आणि शिक्षकवर्गाने विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास, वेळोवेळी घेतलेल्या चाचण्या, शंका निरसन सत्रे आणि वैयक्तिक मार्गदर्शनाच्या माध्यमातून सक्षम तयारी करून दिली. व्यवस्थापनाने दिलेले पाठबळ आणि शिक्षकांची समर्पित वृत्ती यामुळे विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट निकाल मिळविल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.टी.ए. पाटील इंग्रजी शाळेच्या या उल्लेखनीय यशामुळे पडघा परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून गुणवंत विद्यार्थ्यांवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शाळेने सातत्याने राखलेली शैक्षणिक गुणवत्ता आणि शतप्रतिशत निकालाची परंपरा ही इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून परिसरात शाळेच्या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.


