हास्यकल्लोळात विरला तणाव ; ठाणे मनोरुग्णालयात फुलला आनंद 

ठाणे – रुग्णालय म्हटलं की गंभीर चेहरे, औषधोपचार आणि चिंतेचे वातावरण अशी सर्वसाधारण कल्पना असते. मात्र ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयात नुकतेच काहीसे वेगळे चित्र पाहायला मिळाले. खळखळून हसण्याचे आवाज, टाळ्यांचा कडकडाट आणि चेहऱ्यावर उमटलेले आनंदाचे हास्य यामुळे संपूर्ण परिसर प्रसन्न झाला होता. निमित्त होते लाफ्टर थेरपी अर्थात हास्य उपचार कार्यक्रमाचे.

मानसिक आरोग्य उपचारांमध्ये औषधांसोबतच आनंद, सकारात्मकता आणि भावनिक आधार यांचे महत्त्व ओळखून प्रादेशिक मनोरुग्णालयाने हा अभिनव उपक्रम आयोजित केला. सुप्रसिद्ध विनोदी कलाकार  एन. अशोक यांनी आपल्या मिश्किल शैलीत रुग्ण, डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांना खळखळून हसवले.

सामान्यतः मानसिक आजारांशी झुंज देणाऱ्या रुग्णांच्या आयुष्यात ताण, चिंता आणि नैराश्याचे सावट असते. अशा परिस्थितीत काही क्षणांचे मनमोकळे हास्य त्यांच्यासाठी नव्या उमेदीचा स्रोत ठरू शकते. कार्यक्रमादरम्यान अनेक रुग्णांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. काहींच्या चेहऱ्यावर अनेक दिवसांनी उमटलेले हास्य उपस्थितांच्या मनालाही स्पर्शून गेले.

आरोग्य उपसंचालक डॉ. अशोक नांदापुरकर यांच्या अध्यक्षतेखाली व वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली ‘Stress Management at Workplace’ या उद्देशाने लॉफ्टर थेरपी उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमामुळे डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांना दैनंदिन ताणतणावातून काही काळ मुक्त होऊन सकारात्मक ऊर्जा आणि मानसिक ताजेपणा अनुभवण्याची संधी मिळाली.

मानसोपचार क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, हास्यामुळे शरीरात सकारात्मक रसायनांची निर्मिती होते. तणाव कमी होतो, आत्मविश्वास वाढतो आणि उपचार प्रक्रियेला पूरक वातावरण तयार होते. त्यामुळे लाफ्टर थेरपी ही आज जगभरात पूरक उपचारपद्धती म्हणून स्वीकारली जात आहे.

हास्य हे मानसिक आरोग्यासाठी प्रभावी औषध आहे. मनमोकळे हसल्याने तणाव कमी होतो, सकारात्मकता वाढते आणि रुग्णांच्या मानसिक स्वास्थ्याला बळ मिळते.

डॉ.अशोक नांदापूरकर (आरोग्य उपसंचालक ठाणे)




Scroll to Top