“जमीन ही आपली आई आहे. आपल्या आईला विकू नका. श्रमजीवी संघटना यापुढे आदिवासींचे अंगठे कापू देणार नाही. प्रत्येक कातकरी वाडीत अन्यायाविरुद्ध लढणारा नाग्या कातकरी उभा राहिला पाहिजे,” असा घणाघाती निर्धार श्रमजीवी संघटनेचे कार्याध्यक्ष बाळाराम भोईर यांनी व्यक्त केला.
पालघर तालुक्यातील पोचाडे-तामसई येथे आयोजित गावभेट व सभासद नोंदणी अभियानाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
श्रमजीवी संघटनेची राज्यभर सुरू असलेली भव्य सभासद नोंदणी मोहीम सध्या वेगाने सुरू असून पालघर आणि डहाणू तालुक्यात या मोहिमेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. डहाणू तालुक्यात कार्यकर्ते आणि सभासदांनी संघर्ष करून २,१०० जन्मदाखले मिळवून देण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. या लढ्यामुळे संपूर्ण डहाणू तालुक्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून गावागावांत संघटनेविषयी नव्याने विश्वास आणि आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
यावेळी भोईर म्हणाले, “लोकांचे प्रलंबित प्रश्न संघर्षातूनच सोडवावे लागतात. संघर्षाशिवाय न्याय मिळत नाही. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने संघटित – होऊन लढ्यासाठी सदैव तयार राहिले पाहिजे.” – शिक्षणाच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी सांगितले, – “प्रत्येक मुलाला तीन ते अठरा वर्षापर्यंत मोफत, – सक्तीचे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालेच पाहिजे. महाभारत काळात शिक्षणासाठी आदिवासी वीर एकलव्याचा अंगठा मागितला गेला होता. आता इतिहासाची पुनरावृत्ती होऊ देणार नाही. आदिवासी समाज शिक्षणाचा हक्क मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही. शिक्षणासाठी पुन्हा कोणत्याही आदिवासीचा अंगठा कापला जाणार नाही.”
पोचाडे-तामसई येथे आगमन होताच गावकमिटीच्या वतीने बाळाराम भोईर यांचे औक्षण करून शाल व पुष्पगुच्छ देत स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी पालघर तालुका अध्यक्ष नरेश वरठा, डहाणू तालुका अध्यक्ष हरिश्चंद्र उंबरकर, तालुका सचिव शंकर वरखंडे तसेच सर कार्यकर्त्यांचे तोंडभरून कौतुक केले.
“आज श्रमजीवी संघटनेचे संपूर्ण नेतृत्व तरुणांच्या हाती आले आहे. हीच संघटनेची सर्वात मोठी ताकद आहे. या तरुणांच्या बळावर संघटनेचा संघर्ष अधिक व्यापक आणि प्रभावी होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन गावभेटीदरम्यान त्यांनी शिक्षणाचा हक्क, घराखालील जागा व गावठाण विस्तार, जलजीवन मिशन, घरकुल योजना, जन्म-मृत्यू दाखले, जात प्रमाणपत्रे तसेच विविध शासकीय योजनांचा लाभयाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
या सभेला पालघर तालुका अध्यक्ष नरेश वरठा, डहाणू तालुका अध्यक्ष हरिश्चंद्र उंबरकर, तालुका सचिव शंकर वरखंडे, कैलास कोलेकर, सुनील दुमाडा, गणेश बुंधे, कृष्णा गिंभल, अजय भंडारी यांच्यासह पोचाडे-तामसई व परिसरातील मोठ्या संख्येने सभासद, ग्रामस्थ आणि तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.


