ठाण्यात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिका सतर्क

आयुक्त सौरभ राव यांचा आपत्कालीन कक्षाचा घेतला आढावा

ठाणे शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिका प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा अधिक सतर्क केली आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सोमवारी दुपारी महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट देऊन दिवसभरात प्राप्त झालेल्या तक्रारी, त्यावर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेतला.

यावेळी नगरअभियंता प्रशांत सोनग्रा, उप आयुक्त जी.जी गोदेपुरे, उप नगरअभियंता शुभांगी केसवाणी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासीन तडवी आदी उपस्थित होते.

यावेळी शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचण्याच्या घटनांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. ज्या-ज्या भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी संबंधित विभागांनी सतत सतर्क राहून तातडीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश आयुक्तांनी दिले. तसेच नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, अफवांवर विश्वास ठेवूनये आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास महापालिकेच्या आपत्कालीन विभागाशी 02225371010 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे
आवाहन त्यांनी केले.

पावसाळ्यात झाडे कोसळण्याच्या घटनांबाबत बोलताना आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले की, पर्यावरणाचा समतोल राखत नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी झाडांची शास्त्रशुद्ध छाटणी केली जात आहे. गेल्या चार महिन्यांपासून शहरात सुमारे सहा हजारांहून अधिक झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली आहे.

सोसायटीच्या आवारातील झाडांची जबाबदारी संबंधित गृहनिर्माण संस्थेची असली तरी, ज्या ठिकाणाहून मागणी आली तेथे महापालिकेने पुढाकार घेऊन छाटणी केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्या पावसासोबत जोरदार वारेही वाहत असल्याने झाडे व फांद्या पडण्याच्या घटना वाढत आहेत.

या पार्श्वभूमीवर आपत्कालीन प्रतिसादासाठी मनुष्यबळ दुप्पट करण्यात आले असून, छाटणीनंतर निर्माण होणारा हिरवा कचरा तातडीने उचलण्याचे कामही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्यांबाबतही महापालिकेने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. आयुक्तांनी सांगितले की, पावसाचा जोर कमी होताच मास्टिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने खड्डे भरण्याचे काम मोठ्या प्रमाणावर हाती घेतले जाईल. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून सलग मुसळधार पाऊस सुरू असूनही नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पावसातही मास्टिक टाकण्याचे काम सुरू ठेवण्यात आले आहे. प्राप्त होणाऱ्या प्रत्येक तक्रारीवर २४ तासांच्या आत कार्यवाही करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

झाड पडल्यामुळे पांडुरंग भुवड हे नागरिक जखमी झाले असून महापालिका अधिकारी आणि स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे यांनी त्यांना तातडीने महापालिकेच्या महावीर जितो रुग्णालयात दाखल केले.

Scroll to Top