कोकणातील पूरस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज

नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा, यंत्रणा अहोरात्र कार्यरत

पावसाचा जोर वाढल्याने कोकण विभागातील नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. बुधवार, ०८ जुलै २०२६ रोजीच्या प्रशासकीय आकडेवारीनुसार, कोकण विभागातील एकूण २७ नद्यांपैकी तब्बल ९ नद्यांनी इशारा पातळी ओलांडली असून त्यापैकी काहींनी धोक्याची पातळीही पार केली आहे. यामुळे ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील नदीकाठच्या गावातील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर येथे उल्हास नदीने १७.५० मीटरची धोक्याची पातळी ओलांडून १७.७० मीटरची धोकादायक पातळी गाठली आहे. तसेच, जांभूळपाडा येथेही उल्हास नदी १४.८० मीटरवर वाहत असून तेथील धोक्याची पातळी १४.०० मीटर इतकी आहे. कल्याणमधील मोहने येथे उल्हास नदीची पातळी ९.९० मीटरवर पोहोचली असून तिने ९.०० मीटरची इशारा पातळी ओलांडली आहे. टिटवाळा येथे काळू नदीने १०२.०० मीटरची इशारा पातळी पार केली असून सध्या ती १०२.३५ मीटरवर वाहत आहे.

रायगड जिल्ह्यातही रोहा तालुक्यातील कुंडलिका आणि अंबा या दोन्ही नद्या थेट धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. कुंडलिका नदीची धोक्याची पातळी २३.९५ मीटर असताना आजची तिची पातळी २४.४० मीटरवर पोहोचली आहे. तर अंबा नदीने ९.०० मीटरची धोक्याची पातळी ओलांडत १०.३५ मीटरचा टप्पा गाठला आहे. महाडमध्ये सावित्री नदीनेही धोक्याची ६.५० मीटरची पातळी पार केली असून सध्या ती ७.६२ मीटरवरून वेगाने वाहत आहे.

पनवेलमधील पाताळगंगा नदीची इशारा पातळी २०.५० मीटर असून ती आज २१.३० मीटरवर पोहोचली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून वाहणाऱ्या जगबुडी नदीने ५.०० मीटरची इशारा पातळी ओलांडली असून तिची सध्याची पातळी ६.९० मीटरवर गेली आहे. ही पातळी ७.०० मीटरच्या धोक्याच्या रेषेच्या अगदी जवळ असल्याने खेडवासियांना सतर्क करण्यात आले आहे. पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नद्या सुदैवाने अद्याप इशारा पातळीच्या खाली वाहत आहेत. कोकणातील या पूरस्थितीमुळे नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन स्थानिक यंत्रणांकडून करण्यात येत आहे.

Scroll to Top