युवकांना कौशल्य विकास, रोजगार आणि स्वावलंबनाकडे सक्षम करणाऱ्या लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशनच्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त अंबिवली, डोंबिवली, ठाणे आणि मुलुंड येथील लाईटहाऊस केंद्रांवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या चारही केंद्रांमध्ये मिळून एकूण ३६३ युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या निमित्ताने लाईटहाऊसच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण घेऊन विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह प्रदान करून गौरव करण्यात आला. तसेच विविध कौशल्य विकास अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या युवक-युवतींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमांमध्ये युवकांनी आपले प्रेरणादायी अनुभव आणि यशोगाथा उपस्थितांसमोर मांडल्या. सांस्कृतिक सादरीकरणे, संवादात्मक उपक्रम आणि माजी विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे सर्व केंद्रांवर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. रोजगार मिळवून यशस्वी वाटचाल करणाऱ्या युवकांचा गौरव करत इतर युवकांनाही कौशल्य विकासाच्या माध्यमातून स्वावलंबी होण्यासाठी प्रेरित करण्यात आले. या कार्यक्रमांना आजी-माजी नगरसेवक, शासकीय अधिकारी, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. त्यांनी लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशनच्या गेल्या दशकातील कार्याचे कौतुक करत युवकांना कौशल्याधारित शिक्षण आणि रोजगाराच्या संधींचा लाभघेण्याचे आवाहन केले. गेल्या दहा वर्षांपासून लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशनने हजारो युवकांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगाराच्या संधी आणि आत्मविश्वास प्रदान करून त्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणले आहे.


