मुरबाड तालुक्यात ट्रान्सफॉर्मर फोडून त्यातील तांब्याच्या तारा चोरणाऱ्या सराईत टोळीचा मुरबाड पोलिसांनी पर्दाफाश करत ७ आरोपींना अटक केली असून एका विधीसंघर्षग्रस्त बालकावरही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत ठाणे ग्रामीण व रायगड जिल्ह्यातील एकूण १२ गुन्ह्यांची उकल झाली असून ८ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
संगम गाव हद्दीतील रस्त्यालगत असलेला ट्रान्सफॉर्मर १७ जुलै २०२६ पूर्वी अज्ञात चोरट्यांनी फोडून त्यातील तांब्याच्या तारा चोरून नेल्याची तक्रार महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ रविंद्र काळुराम घुडे (वय ३३, रा. सरळगाव) यांनी मुरबाड पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानुसार गुन्हा नोंद करून तपास सुरू करण्यात आला.
तपासादरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे तांब्याच्या तारा विक्रीसाठी मुरबाड येथे येणाऱ्या संशयितांवर पोलिसांनी सापळा रचून सुनिल रमेश पवार (२२, रा. खरब्याची वाडी, मुरबाड) आणि प्रशांत प्रकाश वाघ (२०, रा. विढे, तुळई) यांना चोरीच्या मालासह ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्या चौकशी व मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणातून या गुन्ह्यातील मुख्य आरोपी नरेश भाऊ मोरे (३६, रा. कळंबाड), सूरज अशोक पारधी (२०, रा. कळंबाड) तसेच किसन रामरूप कुमार (२५, रा. कोरावळे), निशांत मोहन सिंग (१८, रा. देवगाव फाटा, मुरबाड) आणि राज गुलाबचंद यादव (१९, रा. सोनारपाडा, मुरबाड) यांना अटक करण्यात आली. या गुन्ह्यात एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचाही सहभाग निष्पन्न झाल्याने त्याच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात आली.
आरोपींकडे केलेल्या सखोल चौकशीत त्यांनी मुरबाड, कल्याण तालुका, शहापूर, वाशिंद, कसारा, किन्हवली, टोकावडे तसेच रायगड जिल्ह्यातील नेरळ व खालापूर परिसरात ट्रान्सफॉर्मर फोडून तांब्याच्या तारा चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.
यामध्ये ठाणे ग्रामीणतील १० आणि रायगड जिल्ह्यातील २ असे एकूण १२ गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलिसांनी चोरीस गेलेल्या तांब्याच्या नारा, गुन्ह्यात वापरण्यात आलेली एक छोटा मालवाहू वाहन व चार मोटारसायकली असा एकूण ८ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये चोरीचा माल सुमारे ५ लाख रुपये आणि वाहने ३ लाख २० हजार रुपये किमतीची आहेत.
ही उल्लेखनीय कारवाई डॉ. विनयकुमार राठोड (पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण), अनमोल मित्तल (अप्पर पोलीस अधीक्षक), अरुण लाड (उपविभागीय पोलीस अधिकारी, मुरबाड) आणि दादासो एडके व्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, सपोनि संदीपान सोनावणे, पोउपनि शाम आरमाळकर, सपोफौ महादेव खोमणे, नितीन घाग, राम शिंदे, राहुल गावडे, धनराज देवरे, अर्जुन पारधी, राम काळे तसेच सायबर पोलीस ठाण्याचे सपोनि दानिश मन्सुरी व पोहवा दीपक गायकवाड यांच्या पथकाने केली.


