महापालिका आयुक्तांची आरोग्य विभागात अचानक भेट

गैरहजर १५ कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईचे आदेश

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनमोल सागर यांनी बुधवारी २२ जुलै रोजी महानगरपालिकेच्या जुन्या इमारतीतील आरोग्य विभागाच्या स्वच्छता कॅबिनला अचानक भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. या पाहणीदरम्यान एकूण २१ सफाई कर्मचाऱ्यांपैकी तब्बल १५ कर्मचारी विनापरवानगी गैरहजर असल्याचे उघडकीस आल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

अचानक झालेल्या या तपासणीत उपस्थिती नोंदवही आणि प्रत्यक्ष उपस्थित कर्मचाऱ्यांची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी मोठ्या संख्येने कर्मचारी कोणतीही पूर्वपरवानगी अथवा वैध कारण न देता अनुपस्थित असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकाराची गंभीर दखल घेत आयुक्तांनी संबंधित गैरहजर कर्मचाऱ्यांवर तातडीने शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश संबंधित विभागप्रमुखांना दिले. तसेच नागरिकांना दर्जेदार स्वच्छता सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळेचे आणि कर्तव्याचे काटेकोर पालन करावे, अशा सूचनाही आयुक्तांनी यावेळी दिल्या. महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये अशाच प्रकारच्या आकस्मिक तपासण्या यापुढेही सुरू राहणार असून, विनाकारण गैरहजर राहणाऱ्या किंवा कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Scroll to Top