कर्करोग तपासणी आता घराजवळ ‘कॅन्सर व्हॅन’ जिल्हाभर धावणार

कर्करोगाचे वेळेत निदान व्हावे आणि नागरिकांना घराजवळच अत्याधुनिक तपासणीची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने ‘कॅन्सर व्हॅन’ उपक्रम सुरू केला आहे. ही अत्याधुनिक व्हॅन संपूर्ण ऑगस्ट महिन्यात ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी फिरणार असून, पहिल्या टप्प्यात ३ ते ११ ऑगस्टदरम्यान नवी मुंबई महापालिका क्षेत्रात मोफत कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.

या व्हॅनमध्ये तोंडाचा, स्तनाचा आणि गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे स्क्रीनिंग, आवश्यक तपासण्या आणि तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन केले जात आहे. कर्करोगाचे सुरुवातीच्या टप्प्यात निदान करून वेळेत उपचार सुरू करता यावेत, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

सध्या ही व्हॅन ऐरोली येथील राजमाता जिजाऊ जनरल हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असून, तोंडाच्या कर्करोगासाठी ओरल स्क्रीनिंग करण्यात येत आहे. संशयास्पद जखम किंवा गाठ आढळल्यास ओरल बायोप्सीची सुविधाही उपलब्ध आहे. महिलांसाठी स्तनाची क्लिनिकल तपासणी तसेच गर्भाशयमुखाच्या कर्करोगासाठी पॅप स्मिअर चाचणीही व्हॅनमध्येच केली जात आहे. तपासणीत संशयित रुग्ण आढळल्यास त्यांना पुढील निदान व उपचारासाठी तज्ज्ञ रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे.

या मोहिमेत प्रशिक्षित डॉक्टर व आरोग्य कर्मचारी कार्यरत असून, विशेषतः तंबाखू 19128804
किंवा गुटखा सेवन करणारे, धूम्रपान करणारे तसेच ३० वर्षांवरील महिला-पुरुषांनी या मोफत तपासणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन दंत शल्य चिकित्सक डॉ. अर्चना पवार यांनी केले आहे. या उपक्रमासाठी मेडिकल सुपरिटेंडंट डॉ. माधवी इंगळे, डॉ. शोभना चव्हाण, डॉ. अर्चना पवार, डॉ. अशफाक सिद्दीकी यांच्यासह आरोग्य कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात १२ ते २१ ऑगस्टदरम्यान कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात, तर तिसऱ्या टप्प्यात २२ ते ३१ ऑगस्टदरम्यान उल्हासनगर महापालिका क्षेत्रात ‘कॅन्सर व्हॅन’ द्वारे मोफत तपासणी व जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.

याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार म्हणाले, ‘कर्करोग हा लपवण्याचा नव्हे, तर वेळेत ओळखून उपचार करण्याचा आजार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाल्यास तो पूर्णपणे नियंत्रणात आणता येऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी कोणताही संकोच न बाळगता या मोफत तपासणीचा लाभ घ्यावा.

Scroll to Top