रजोनिवृत्तीच्या काळात महिलांना भेडसावणाऱ्या आरोग्य समस्यांवर योग्य वेळी उपचार, मार्गदर्शन आणि समुपदेशन मिळावे, यासाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या रजोनिवृत्ती कक्षाची आता जागतिक स्तरावर दखल घेतली जात आहे. संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीच्या देशप्रमुख अँड्रिया वोजनार यांच्या शिष्टमंडळाने ठाणे सिव्हिल रुग्णालयाला भेट देत महाराष्ट्रातील या उपक्रमाची माहिती घेतली.
यावेळी वोजनार यांनी महिलांसाठी उपलब्ध असलेल्या रजोनिवृत्ती कक्षाची पाहणी केली. रजोनिवृत्तीच्या काळात आवश्यक मार्गदर्शन, तपासण्या, उपचार आणि समुपदेशन एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. सरकारी रुग्णालयातून सर्वसामान्य महिलांना ही सुविधा उपलब्ध होणे विशेष महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्रातील या उपक्रमातून मिळणारा अनुभव आणि त्याची कार्यपद्धती भारतातील इतर भागांसह जगभरातील देशांसाठी उपयुक्त ठरू शकते, असे वोजनार यांनी सांगितले. त्यामुळे ठाणे सिव्हिलमधील हा कक्ष रजोनिवृत्तीच्या आरोग्यसेवेसाठी अनुकरणीय ठरण्याची शक्यता आहे. रजोनिवृत्तीच्या काळात शरीरातील संप्रेरकांमध्ये होणाऱ्या बदलांमुळे झोपेच्या समस्या, मानसिक अस्वस्थता, सांधेदुखी, हाडांची झीज यांसह विविध आरोग्यविषयक त्रास उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत महागड्या खासगी उपचारांऐवजी सरकारी रुग्णालयात तज्ज्ञ मार्गदर्शन, तपासणी आणि उपचार उपलब्ध होणे आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी मोठा दिलासा ठरत आहे. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धीरज महांगडे, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सचिन घोलप, डॉ. शोभना चव्हाण, डॉ. श्रेया शेळके आणि विनोद जोशी यांनी शिष्टमंडळाला रजोनिवृत्ती उपक्रमाची माहिती दिली.


