ठाणे महापालिकेचा ४४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

ठाणे महापालिकेचा ४४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ठाणेकरांचा ठाणे भूषण, ठाणे गौरव, ठाणे गुणीजन पुरस्काराने सन्मान

ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून शहराचा विकास होत असताना यात ठाणेकरांचे देखील योगदान असते. ठाणे शहरातील नागरिक देखील विविध क्षेत्रात कार्यरत असताना सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून समाजोपयोगी काम करत आहेत, त्यांच्या या कार्याला सलाम करण्यासाठी किंबहुना त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कौतुक करण्यासाठी पुरस्काराची गरज असते. हा सन्मान त्यांच्याबरोबरच शहराचा ही असतो असे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.
ठाणे महानगरपालिकेचा ४४ वा वर्धापन दिन गुरुवारी (१) उत्साहात राम गणेश गडकरी रंगायतन येथे उत्साहात पार पडला. ठाणे महापालिका हद्दीत राहणाऱ्या व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ठाणेकर नागरिकांना ठाणे भूषण, पुरस्काराने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी श्री. शिंदे यांनी आपल्या भाषणात ठाणे महानगरपालिकेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत महापालिकेने राबविलेल्या विकासकामांचा आढावा घेतला.
यावेळी पं मुकुंद मराठे, पत्रकार एकनाथ बिरवटकर, आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू श्रीकांत वाड, चंद्रशेखर महाशब्दे, देविदास चाळके, संजीव ब्रह्मे, सदाशिव टेटविलकर, प्रकाश कोटवानी, अनिरुद्ध जोशी, सदाशिव कुलकर्णी, सुभाष मालेगांवकर, रामचंद्र चिमाजी जंगले यांना ठाणे भूषण पुरस्काराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच आशियाई स्पर्धेत नेमबाजीच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात कांस्यपदक पटकाविणाऱ्या रूद्रांश बाळासाहेब पाटील याचाही ठाणे गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
तर ठाणे गौरव, ठाणे गुणीजन, विशेष कला व क्रीडा क्षेत्रात यश प्राप्त करणाऱ्या खेळाडूंचा विशेष सन्मान खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, महापौर शर्मिला पिंपळोलकर, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, शिवसेना गटनेते पवन कदम, कोपरी प्रभाग समिती सभापती मीनल संख्ये, माजिवडा मानपाडा प्रभाग समिती सभापती सिद्धार्थ ओवळेकर, वर्तकनगर प्रभाग समिती सभापती जयश्री डेव्हीड, वागळे प्रभाग समिती सभापती एकता भोईर, लोकमान्य सावरकर प्रभाग समिती सभापती निर्मला कणसे, कळवा प्रभाग समिती सभापती विजया लासे, दिवा प्रभाग समिती सभापती दिपक जाधव यांच्यासह ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर, राम रेपाळे रमाकांत मढवी, मनोज शिंदे, सुहास देसाई, सुनेश जोशी, राजेंद्र फाटक, मुकेश मोकाशी, संजय वाघुले, राकेश शिंदे, प्रशांत जाधवर, नगरसेविका विमल भोईर, संध्या मोरे, नम्रता पमनानी, उषा वाघ, अर्चना पाटील, मृणाल पेंडसे, सुखदा मोरे, नम्रता कोळी, प्रतिभा मढवी आदी उपस्थित होते.
दरम्यान सकाळी महापालिका भवन येथे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते महापालिका ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, अतिरिक्त आयुक्त १ प्रशांत रोडे, अतिरिक्त आयुक्त २ मेजर डॉ नितीन राठोड, उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, दीपक झिंजाड आदी उपस्थित होते.

Scroll to Top